nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांदेड महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत राष्ट्रीय नदीकृती आराखडा (NRAP) अंतर्गत गोदावरी नदी कायमस्वरुपी प्रदुषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे करीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व सल्लागाराची नेमणुक करणे. || साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदल बाबत ||  
समाचार

Dated :05-Aug-2014
केवळ सात तासात 282 उमेदवारांच्या थेट मुलाखती 


• एनयुएचएमच्या महाभरतीत महापालिकेने नोंदवला विक्रम
• 55 जागेसाठी 1692 जणांचे अर्ज
• उमेदवारांना मुलाखतीतच गुण सांगण्याचा पहिलाच प्रयोग

नांदेड, दि. 5: राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गतच्या 55 विविध जागेच्या भरती प्रक्रियेत 1692 उमेदवारांचे थेट अर्ज स्विकारण्यापासून त्यांची छाननी, मुलाखतीसाठी पात्र आणि अंतीम पात्र 55 उमेदवारांची निवड अशी संपूर्ण प्रक्रिया प्रभारी मनपा आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे यांच्या नेतृत्वाखालील टीमने केवळ 16 तासात राबवून नांदेड महापालिकेने आपल्या नावावर एक वेगळा विक्रम नोंदवला आहे.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानात नांदेड मनपा क्षेत्राचा समावेश करण्यात आला असून या योजनेत 55 नवीन पदे मंजूर करुन महापालिकेस भरती करण्याच्या सूचना होत्या. या योजनेत शहरात आणखी चार रुग्णालये प्रस्तावित असून त्यामुळे मनपा क्षेत्रातील आरोग्य सेवेचे आणखी बळकट होणार आहे. या चारही रुग्णालयावर होणारा सर्व खर्च केंद्र सरकार करणार असून महापालिकेने रुग्णालयासाठी केवळ जागा किंवा इमारत उपलब्ध करुन द्यावयाची आहे.

भरतीसाठी दि. 25 जुलै रोजी उमेदवारांना त्यांच्या कागदपत्रांसह थेट आमंत्रित करुन त्यांचे अर्ज सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत स्विकारण्यात आले. अर्ज भरतानाच उमेदवारांनाच त्यांच्या शैक्षणिक अहर्तेतील निश्चित केलेल्या गुणांच्या तुलनेत त्यांना छाननीअंती मिळणा-या गुणांचा तक्ता भरण्याची पध्दत समजावून सांगण्यात आली. त्याकरिता मार्गदर्शन करण्यासाठी दोन स्वतंत्र टेबलवर अधिकारी व कर्मचा-यांची वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. मुलाखतीस पात्र ठरण्यापुर्वीच सरासरी गुण कळत असल्यामुळे ही पध्दत सुलभ आणि योग्य असल्याची खात्री उमेदवारांनाही पटली. त्यामुळे कमी गुण मिळणारे छाननीची यादी लागण्यापुर्वीच घरी परतले.

दुपारी 2 ते 5 यावेळेत छाननीची प्रकिया पूर्ण झाली. त्यात एका पदास पाच याप्रमाणे पारिचारिकेच्या 35 पदांसाठी 177, स्टाफ़ नर्सच्या 10 पदांसाठी 50, फ़ार्मासिस्टच्या 5 पदांसाठी 26, लॅब टेक्नीशियनच्या 5 पदांसाठी 29 अशा एकूण 282 उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार दि. 26 रोजी सकाळी 10 वाजता मुलाखतीला बोलावण्यात आले.

निवड समितीने द्यावयाचे 10 गुणांचे निकष ठरविण्याचे अधिकार निवड समिती अध्यक्षांना अर्थात आयुक्तांना होते. त्याचा योग्य वापर करण्यासाठी प्रभारी आयुक्तांनी स्वत:भोवतीच आचारसंहिता लावून या प्रक्रियेत आणखी पारदर्शकता आणली. मुलाखतीत उमेदवारांना त्यांचे अतिरिक्त शिक्षण आणि अनुभव अशा दोन निकषाच्या आधारे ज्यांचे अतिरिक्त शिक्षण व अनुभव जास्त अशा पध्दतीने उतरत्या क्रमाने तात्काळ निवड यादी लावली.
एवढ्या मोठ्या संख्येने प्रत्येक उमेदवारांची वेगळी मुलाखत घेण्यासाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता होती. परंतु मुलाखत गुणांचा तक्ताच निश्चित केल्याने आलेल्या उमेदवारांना केवळ त्यांचे केवळ गुण सांगण्याचीच औपचारिकता शिल्लक होती. त्यामुळे डॉ. देशपांडे यांनी एकाच वेळी एका पदाच्या 5-5 उमेदवारांना त्यांच्या अतिरिक्त शैक्षणिक अहर्ता आणि अनुभवाच्या प्रमाणपत्रासह बोलावून त्यांना देण्यात आलेले गुण मुलाखत सुरु असतानाच समजावून सांगितले. त्यामुळे संबधित उमेदवारांना आपली निवड होणार की नाही याची माहिती निवड यादीपुर्वी जाहीर होण्यापुर्वीच मिळाल्याने यात कोणालाही आक्षेप घेणे किंवा हस्तक्षेप करण्यास संधीच मिळाली नाही. जसजशी निवड झाली तसतशी लगेच यादीही जाहीर करण्यात आली.

स्टॉफ़ नर्सच्या शेवटच्या एका आणि परिचारिकेच्या शेवटच्या चार जागांसाठी मोठी चुरस झाली. या पदासाठी गुणानुक्रमे पात्र ठरणा-या अनुक्रमे 4 आणि 12 उमेदवारांना समान गुण मिळाल्याने त्यांना त्यांच्याकडील अतिरिक्त शैक्षणिक कागदपत्रे व अनुभवाचे दाखले असल्यास त्यासह दुस-या दिवशी बोलावण्यात आले. पात्र आणि प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांच्या नावांची निशिच्ती करुन उर्वरीत उमेदवारांना अपात्र ठरण्यात आले.

उमेदवारांचे थेट अर्ज मागवून दुस-याच दिवशी छाननीअंती थेट मुलाखती आणि निवड असे नियोजन करण्यात आले होते. आधीचे मनपा आयुक्त जी. श्रीकांत हे साता-याला बदलीवर गेल्यानंतर या भरतीची संपूर्ण धुरा प्रभारी आयुक्त डॉ. देशपांडे यांच्यावर आली. जिल्हा निवड समितीसह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध भरतीचा अनुभव पाठिशी असल्याने अचानक आलेली जबाबदारी समर्थपणे पेलताना वेगळे कौशल्य राबवून अधिक पारदर्शकता आणली.

उमेदवारांचे अर्ज स्विकारण्यासाठी आधी सात टेबलची व्यवस्था केली होती. परंतु परिचारिका पदासाठी आलेल्या जास्त उमेदवारांची संख्या पाहता आणखी तीन टेबल वाढविण्यात आले. गरोदर किंवा तान्हे मूल सोबत असलेल्या महिलांचे अर्ज प्रथम प्राधान्याने स्विकारण्यात आले. प्रत्येक टेबलवर एक सहायक आयुक्त दर्जाचा अधिकारी, एक वैद्यकीय अधिकारी, एक वरिष्ठ लिपीक, दोन लिपीक व एक शिपाई असे मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले होते. आलेले अर्ज थेट संगणकात नोंदवण्याची व्यवस्थाही टेबलवरच करण्यात आल्यामुळे तात्काळ छाननीची प्रक्रिया पार पाडली गेली. केवळ एक पोलिस अधिकारी 12 पोलिस कर्मचारी इतक्या कमी बंदोबस्तात ही प्रक्रिया शांततेत पार पडली.
या संपूर्ण प्रक्रियेत मनपाच्या उपायुक्त (प्रशासन) डॉ. विद्या गायकवाड यांनी उत्कृष्टपणे सर्वांचे समन्वय व संचालन केल्यामुळे अगदी शिस्तबध्द पध्दतीने आणि वेगाने सर्व प्रक्रिया पार पडू शकली. त्याबद्दल प्रभारी आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. महापालिकेचे उपायुक्त (महसूल) राजेंद्र खंदारे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. मीरा कुलकर्णी, डॉ. सुरेशसिंह बिसेन, सिस्टीम मॅनेजर सदाशिव पतंगे, सहायक आयुक्त संजय जाधव, कार्यालय अधिक्षक एस. व्ही. गोरे, जमिल अहेमद, जुल्फ़ेकार अहेमद, वाय. जी. ढोणे, अशोक कदम, गजानन रासे, साहेबराव जोंधळे, रमेश हैबते यांच्यासह महापालिकेच्या विविध अधिकारी व कर्मचा-यांनीही मोलाचे परिश्रम घेतले.

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.