nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांवाशमनपा हदिदत पाण्याच्या टँकर व्यवस्थेबाबत. ||  
समाचार

Dated :26-Mar-2013
सिडकोतील पाणीपुरवठा व मलनि:सारण प्रकल्पासाठी 53.25 कोटी मंजूर 


• महापालिका वर्धापनदिनाची भेट: राज्याच्या शिफारशीनंतर केंद्र शासनाची मंजुरी

• तरोड्यातील 100 कोटीच्या प्रकल्पालाही तांत्रिक मान्यता

नांदेड, दि. 26: नांदेड शहरातील सिडको व हडको परिसराच्या पाणीपुरवठा आणि मलनि:सारणाच्या प्रकल्पासाठी लागणा-या 53 कोटी 25 लाख रुपयांचे दोन प्रकल्प केंद्र सरकारने आज मंगळवारी (दि.26) झालेल्या मंजुरी समितीच्या बैठकीत मंजूर केले. त्याचबरोबर तरोड्यातील 100 कोटीच्या प्रकल्पासही केंद्र सरकारच्या नागरी विकास मंत्रालयाने तांत्रिक मान्यता दिली आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पुढाकाराने पालकमंत्री डी. पी. सावंत, खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार ओमप्रकाश पोकर्णा, आमदार अमर राजूरकर, महापौर अब्दुल सत्तार व उपमहापौर आनंद चव्हाण यांनी या प्रकल्पासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळेच हे प्रकल्प आता मार्गी लागत आहेत.

मंगळवारी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचा 16 वा वर्धापनदिन होता. राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या एकूण 21 प्रकल्पापैकी केंद्रीय मंजुरी व सनियंत्रण समितीने केवळ सिडकोतील अत्यंत महत्वाच्या दोन प्रकल्पांना मंजुरी दिल्यामुळे महापालिकेला ही वर्धापनदिनाची भेट मानल्या जात आहे. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेस जेएनएनयुआरएमअंतर्गत मिळालेल्या निधीतून गुर-ता-गद्दी त्रिशताब्दी सोहळ्यामुळे नांदेड शहरातील पाणीपुरवठा आणि मलनि:सारण व्यवस्था बळकटीकरणावर भर देण्यात आला होता. सिडकोतील बहुतांश भागातील अस्तित्वातील पाणीपुरवठा आणि मलनि:सारण योजना जुनी असल्याने कुचकामी झाली होती. त्यामुळे या भागात नवी नळ आणि मलनि:सारण प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेने राज्य आणि केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता, त्याला यश प्राप्त झाले आहे.

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नुकतीच केंद्रीय नागरी विकास मंत्री कमलनाथ यांची नवी दिल्लीत भेट घेऊन नांदेड महापालिकेच्या हद्दीतील शिल्लक कामे मार्गी लागण्यासाठी प्रस्तावित 200 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. पालकमंत्री डी. पी. सावंत यांनीही या विषयाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून प्रकल्पाच्या मंजुरीसाठी राज्य शासनाच्या वतीने केंद्राकडे शिफारस करण्याचा आग्रह धरला होता. दि. 23 मार्च 2013 रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीची बैठक झाली. या बैठकीस मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासह नांदेड दक्षिणचे आमदार ओमप्रकाश पोकर्णा व महापौर अब्दुल सत्तार हे स्वत: जातीने हजर होते. या बैठकीत नांदेड महापालिकेच्या हद्दीतील एकूण सहा प्रकल्पाला राज्य शासनाने मान्यता देऊन हा प्रकल्प जेएनएनएनयुआरएम अंतर्गत केंद्र शासनाच्या नागरी विकास मंत्रालयाकडे मंजुर करण्याची शिफारस केली.

त्यानंतर आज मंगळवारी (दि.26) नवी दिल्लीत केंद्रीय नागरी विकास मंत्रालयाच्या मंजुरी व सनियंत्रण समितीची बैठक केंद्रीय सचिव डॉ. सुधीर कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत नांदेड मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी महापालिकेच्या वतीने सिडकोतील दोन प्रकल्पाच्या आवश्यकतेचे सादरीकरण केले. यावेळी त्यांच्यासोबत उपायुक्त रत्नाकर वाघमारे, मनपा जेएनएनयुआरएम विभागाचे उपअभियंता सुनील देशमुख, आयएलएफएसचे संजीव पाटील, महेंद्र देशपांडे हे उपस्थित होते. आयुक्तांच्या सादरीकरणाने प्रभावित झालेल्या समितीने सिडको/हडको परिसरातील पाणीपुरवठ्यासाठी 21.98 कोटी तर मलनि:सारण व्यवस्था नूतनीकरणासाठी 31.27 कोटी असे एकूण 53 कोटी 25 लाख रुपयांचे दोन प्रकल्प तात्काळ मंजूर केले, तसेच दोन्ही तरोड्यातील पाणीपुरवठा आणि मलनि:सारण कामासाठी 100 कोटी रुपयांच्या दोन प्रकल्पास तांत्रिक मान्यताही दिली.

या बैठकीत केंद्रीय सचिव डॉ. सुधीर कृष्णा यांनी नांदेड महापालिकेला जेएनएनयुआरएम अंतर्गत सोपवलेले 11 पैकी 8 प्रकल्प पूर्ण केल्याबद्दल आयुक्त जी. श्रीकांत यांचे विशेष अभिनंदन केले. समितीच्या पुढच्या बैठकीत तरोड्याच्या प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता मिळ्ण्याची शक्यता आहे. उर्वरीतपैकी 24 बाय 7 ची पाणीपुरवठा योजना आणि काही नव्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी असे दोन प्रकल्प मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. मंजूर झालेल्या प्रकल्पामध्ये 80 टक्के निधी केंद्र सरकारच्या नागरी विकास मंत्रालयाच्या वतीने तर 10 टक्के निधी राज्य सरकार उपलब्ध करुन देणार आहे. उर्वरीत 10 टक्के नांदेड महापालिकेचा लोकवाटा राहणार आहे.

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.