नांदेड, दि. 21: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सिडको क्षेत्रिय कार्यालयाचे येत्या दि. 25 फेब्रुवारी 2013 पासून सिडकोतील कस्तुरबा मातृसेवा केंद्र (मनपा दवाखाना) येथे स्थलांतर केले जाणार आहे.
सिडकोचे मनपा क्षेत्रिय कार्यालय सध्या सिडकोतील साई मंगल कार्यालयाच्या जागेत सुरु आहे. हे ठिकाण एका टोकाला असल्यामुळे वेळोवेळी कामे करण्यासाठी नागरिकांची गैरसोय होऊ लागली. त्याचबरोबर विविध कार्यक्रमासाठी सिडकोत सार्वजनिक एकच मोठे मंगल कार्यालय असल्यामुळे तेथील क्षेत्रिय कार्यालय स्थलांतरित करावे, अशी मागणी त्या भागातील नगरसेवकांनी केली होती. त्याकरिता साई मंगल कार्यालयाच्या पूर्वी ज्या ठिकाणी क्षेत्रिय कार्यालय कार्यरत होते, त्याच ठिकाणी (मनपा कस्तुरबा मातृसेवा केंद्र, दवाखाना, सिडको) पुन्हा सिडको क्षेत्रिय कार्यालय स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व जनतेने याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे सहाय्यक आयुक्त गुलाम सादेख हे कळवितात.