![]() | ||
| ||
समाचार |
|
Dated :15-Feb-2013 |
|
महापालिका सक्षमीकरणासाठी चौथा वित्त आयोग पूर्णत: पाठिशी – डांगे | |
नांदेड, दि. 15: महसुली उत्पन्न आणि मूलभूत सुविधा तसेच देखभालीसाठी लागणारा खर्च यामधील वेगवेगळ्या अडचणींचे विश्लेषन करुन नांदेड महापालिकेतील असलेल्या तूटीचा अहवाल सादर केल्यास चौथ्या वित्त आयोगाकडून योग्य ती मदत केली जाईल, अशी ग्वाही चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष जे. पी. डांगे यांनी गुरुवारी (दि.15) महापालिकेत घेतलेल्या बैठकीदरम्यान दिली. श्री. डांगे यांनी आपल्या नांदेड दौ-यात नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेस भेट दिली. त्यावेळी मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांची बैठक झाली. श्री. डांगे यांनी दीड वर्षापुर्वी महापालिकेस भेट दिली होती, तेव्हा दिलेल्या सूचनेप्रमाणे किती प्रमाणात काम झाले याची माहिती त्यांनी या बैठकीत घेतली. जी कामे अद्याप शक्य झाली नाहीत, ती जास्तीत जास्त आगामी दोन महिन्यात पूर्ण करुन महापालिकेतील आर्थिक, कामकाजातील वैधानिक अडचणी, महापलिका कायद्यात आवश्यकता वाटणारी सुधारणा, किचकट प्रक्रिया सुलभ करण्यासाठी करता येणारी कार्यपध्दती, अर्थसंकल्पातील तूट भरुन काढण्यासाठी योग्य प्रस्ताव, कर्जाचे हप्ते सुलभ करणे आदी बाबींसंबधी मुद्देनिहाय विश्लेषण करुन पुढच्या पाच वर्षात महापालिकेला लागणारी आर्थिक मदत, अधिकार व यंत्रणेची गरज याची सविस्तर माहिती आयोगाकडे पाठवावी. ही माहिती जितक्या लवकर प्राप्त होईल, तितक्या लवकर आयोगाला पुढच्या स्तरावर सकारात्मक निर्णयासाठी समर्थनीय शिफारसीसह पाठवेल, असे आश्वासन त्यांनी दिले. मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी मूलभूत सुविधा पुरवताना कर हाच महापालिकेकडील उत्पन्नाचा एकमेव मार्ग असून नागरी वित्तब्लधी पुर्णत: सक्षम नसल्यामुळे सर्व सुविधा पुरवताना अनेक आर्थिक अडचणी येतात, याकडे लक्ष वेधले. नांदेड महापलिकेचे वार्षिक उत्पन्नाच्या तुलनेत मुलभूत सुविधांसाठी लागणारा खर्च मोठा आहे. अशा स्थितीत सेवानिवृत्तांच्या नियमित मानधनाचा वाटा राज्य शासनाने उचलावा, मनपा क्षेत्रातून संकलित होणा-या करमणूक करातील उत्पन्नाचा वाटा महापालिकेला देण्याचा निर्णय घ्यावा, भूसंपादनाच्या न्यायालयीन खटल्यामुळे निर्माण होणा-या सुमारे पाचशे कोटीच्या दायित्वाची मदत राज्य शासनाकडून मिळावी, नागरी आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी निधी द्यावा, त्याचबरोबर महसूल व तूट याचे अवलोकन करुन महापालिकेला पुढच्या पाच वर्षातील गरजांप्रमाणे अतिरिक्त निधी द्यावा, अशी मागणी आयुक्तांनी अध्यक्षांकडे केली. अप्पर आयुक्त रा. ल. गगराणी यांनी सूत्रसंचलन करुन आभार मानले. बैठकीस मुख्य लेखा परिक्षक शिवप्रसाद चन्ना, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. साहेबराव मोरे, शिक्षणाधिकारी भागवत जोशी, कार्यकारी अभियंता माधव बाशेट्टी, सहाय्यक आयुक्त संजय जाधव, प्रकाश येवले, सुधीर इंगोले, अविनाश आटकोरे, गुलाम सादेक, टी. एल. भिसे, जनसंपर्क अधिकारी गोविंद करवा, विधी अधिकारी अजितपालसिंघ संधू, उपअभियंता (यांत्रिकी) राजकुमार वानखेडे, स्टेडियम व्यवस्थापक रमेश चौरे, सिस्टीम मॅनेजर सदाशिव पतंगे, मालमत्ता व्यवस्थापक सी. एल .अंकमवार, एल .के. चोरे, एस. एम. नरवाडे, आर. एच. डोईजड आदी उपस्थित होते.
====================================================================
====================================================================
==================================================================== |
|