nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
सन्माननीय सदस्य व स्विकृत सदस्य यादी ||  
समाचार

Dated :07-Feb-2013
बीएसयुपीअंतर्गत ड्रेनेज लाईन जोडण्याची कामे प्राधान्याने करा 


स्थायी समिती सभापती धबाले यांची सूचना

नांदेड, दि. 7: बीएसयुपी अंतर्गत नागरी गरीब असलेल्या लाभार्थ्यांना सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. काही ठिकाणी मूळ नियोजनातून काही कामे शक्य होत नसतील, तर त्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी. डीपीआरचा निधी एकमेकांकडे वळवावा किंवा अतिरिक्त निधी उपलब्ध करावा. परंतु कोणताही लाभार्थी या योजनेतील नागरी सुविधांपासून वंचित राहायला नको, अशी सूचना स्थायी समिती सभापती ग़णपत धबाले यांनी आज गुरुवारी (दि.7) झालेल्या स्थायी समिती सभेत प्रशासनाला केली.

श्री. धबाले यांच्या अध्य्क्षतेखाली झालेल्या स्थायी समिती सभेला मनपा आयुक्त जी. श्रीकांत, अप्पर आयुक्त रा. ल. गगराणी, सदस्य स. सरजितसिंघ गील, गफार खॉंन, फारुख अली, सतीश राखेवार, गुरमितसिंघ नवाब, चॉंदपाशा कुरेशी, अशोक उमरेकर, अ. लतिफ, लतिफा बेगम बु-हानखान, तहेसीन बेगम अब्दुल समद, कमलाबाई मुदीराज, मोहिनी महेश कनकदंडे, अंजली सुरेशराव गायकवाड, शांताबाई मोतीराम मुंडे, नगरसचिव पी. पी. बंकलवाड यांच्यासह महापालिकेचे विविध विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते. सभेपूर्वी सभापतींनी सभेत योग्य पध्दतीने चर्चा होण्यास मदत करण्यासाठी नागरिक अथवा पत्रकारांनी सभेत बसू नये, अशी नम्र सूचना केली. सभा संपल्यानंतर पत्रकारांना सभेची माहिती देण्यासाठी भरपूर वेळ देऊ, अशी ग्वाही दिली.

सभापती धबाले यांनी प्रारंभीच सभेत उपस्थित राहणा-या अधिका-यांनी आपल्या विषयासंबधी अभ्यास करुन यावे तसेच सर्वांनी सभेतून चांगला संदेश जाईल, असे काम सर्वांनी करावे, असे आवाहन केले. सभेला सुरुवात झाल्यानंतर सदस्य अशोक उमरेकर, गुरमीतसिंघ नवाब व शांताबाई मुंडे यांनी पत्रकारांना सभेत बसू देण्याच्या मुद्द्यावरुन सभागृह सोडले.

स. सरजीतसिंघ गील यांनी साईनगरमधीलमधील चॉंद मस्जीद, देशमुख गल्ली व दारुल उलुम शार्मिक शाळेच्या परिसरातील ड्रेनेज लाईनचे काम तात्काळ सुरु करावे, तसेच काही अत्यावश्यक कामांसाठी नेहमी मान्यता घेण्यापेक्षा एकदाच दर निविदा निश्चित करुन कामे तात्काळ मार्गी लावावी, अशी सूचना केली. गफार खॉंन यांनी दुल्हेशाहनगरमधील बीएसयुपीअंतर्गत ड्रेनेज लाईन जोडण्याचे काम वर्षभरापासून अर्धवट सोडल्याचा मुद्दा उपस्थित करुन या कामाची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न केला. तेव्हा अप्पर आयुक्त गगराणी यांनी बीएसयुपी व मलनि:सारण विभागाच्या अधिका-यांनी एकत्रपणे बसून पुढील सभेपुर्वी या विषयावर तोडगा काढावा, अशी सूचना केली. फारुखअली यांनी राज कॉर्नर भागात पाणीपुरवठा व ड्रेनेजचे कनेक्शन न जोडता रस्ता तयार करण्यात आल्याचे सांगून महापालिकेला वांरवांर खर्च करावा लागत असल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले. त्याचबरोबर शंकरसागर जलाशयातील बोटींच्या ज्या कालावधीतील खर्चाची रक्कम यापुर्वी अदा करण्यात आली, त्याच कालावधीचा दुस-यांदा प्रस्ताव आणून रक्कम देण्यात येत असल्याबद्दल आक्षेप घेतला. या विषयाची चौकशी अप्पर आयुक्तांनी करुन पुढील सभेत अहवाल ठेवावा, असे सभापतींनी सूचित केले.

सतीश राखेवार यांनी हातपंप दुरुस्तीसाठी नेमलेल्या ठेकेदाराकडून काम करण्यास टाळाटाळ होत असल्याचे सांगून सदस्यांच्या सूचनेचा सन्मान करण्याची तंबी आयुक्तांकडून संबधीत ठेकेदाराला देण्याची सूचना केली. मोहिनी कनकदंडे यांनी विकास कामासाठी संपादीत केलेल्या जागेचा वाढीव मावेजा देण्याऐवजी संबधितांना चर्चेसाठी बोलावून वाटाघाटी कराव्यात, त्यातून महापालिकेवर अनावश्यक भुर्दंड पडणार नाही, तसेच देखभाल दुरुस्तीवर होणारा खर्च विषयपत्रिकेत एकत्र समाविष्ट करावा, असे सुचविले. अंजली गायकवाड यांनी जयभीमनगर, आशिर्वादनगर भागातील ड्रेनेजलाईनची कामे अपूर्ण असल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले. गरिब नागरिकांना नागरी सुविधा पुरविण्याचे काम योग्य त-हेने झाले पाहिजे, अन्यथा आपले नाव खराब होईल, अशी चिंता व्यक्त करुन गफार खॉंन आणि अंजली गायकवाड यांनी कामाकडे योग्य लक्ष दिले जात नसल्याची खंत व्यक्त केली. बीएसयुपी विभागाने जेथे कामासाठी निधी नाही, तेथे अन्य डीपीआरमधून उपलब्ध करुन घेण्यासाठी अथवा महापालिकेच्या वतीने आगामी अर्थसंकल्पात तरतूद करुन घेण्यासाठी प्रयत्नशील राहावे. कामे करुन घेणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे नमूद करीत सभापती धबाले यांनी बीएसयुपीतील दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचे सांगितले. सदरची सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. विषयपत्रिकेवरील 28 पैकी 27 विषय मंजूर झाले. एका विषयाची तपशीलवार माहिती पुढील सभेत ठेवण्यात आल्यानंतर त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सर्वांचे आभार मानून सभा संपल्याचे सभापतींनी जाहीर केले.

====================================================================

====================================================================

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.