नांदेड, दि. 22: महापालिकेचा मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करणार्याक मालमत्ताधारकांच्या मालमत्तेला सील ठोकण्याची कारवाई शहरात सुरुच असून मंगळवारी (दि.22) सिडकोतील एका आणि इतवा-यातील दोन मालमत्तेला सील ठोकण्यात आले. इतवाराचे सहाय्यक आयुक्त सुधीर इंगोले आणि सिडकोचे सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक यांच्या नेतृत्वाखालील वसुली पथकाने ही कारवाई केली. पाच दिवसात संबधितांनी त्यांच्याकडील कराच्या रक्कमेचा भरणा केला नाही, तर त्यांची मालमत्ता जप्त करुन त्यांना दिलेल्या महापालिकेच्या सुविधा बंद करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे.
सुदाम साडोळे/जनाबाई साडोळे यांच्या 11-6-734 क्रमांकाच्या मालमत्तेपोटी 11 हजार 72 रुपये तर इतवारा क्षेत्रिय कार्यालयांतर्गत इतवारा मुर्गी बाजार येथाल मनपा/ रहेमत उल्ला शहा तुराब अलीशाह यांच्या 7-3-183 च्या मालमत्तेपोटी 17 हजार 543 आणि नावघाट, बुरुडगल्ली येथील वामन विश्वनाथ मांजरमकर यांच्या 5-3-176 क्रमांकाच्या मालमत्तेपोटी 18 हजार 977 रुपयांची कर येणेबाकी होती. मंगळवारी त्यांच्याकडे करवसुली व जप्ती पथक गेल्यानंतरही त्यांनी कराचा भरणा करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांच्या मालमत्तेला सील ठोकण्यात आले. इतर मालमत्ताधारकांनीही आपल्याकडील मालमत्ता कर भरुन जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
या मोहिमेत इतवारा क्षेत्रिय कार्यालयाचे बंडोपंत उत्तळरवार, पाशमवाड, मकसुद, नायकवाडे, कर निरीक्षक रफीक, शिरमेवार, सिडको क्षेत्रिय कार्यालयातील पद्माकर कावळे, भालचंद्ग चामे, अ.हबीब, घाळे,पवळे, पटणे, भालेराव यांनी सहभाग घेतला.