nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
जाहिर लिलाव सूचना : - नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हददीतील तयबाजारी, आठवडी बाजार, दैनिक जमिन भाडे (नो हॉकर्स झोन वगळून) भाडे वसुलीचा मक्ता ताबा देणे बाबत. || नांवाशमनपा जाहीर सुचना ||  
समाचार

Dated :19-Jan-2013
विष्णुपुरीतून शेतीसाठी पाणी खेचणारे आणखी दोनशे पाईप कापले 



नांदेड, दि. 19: विष्णुपुरी येथील शंकरसागर जलाशयातील पिण्यासाठी आरक्षित जलसाठ्याचे संरक्षण करणार्‍या दक्षता पथकाने शुक्रवारी (दि.18) शेतीसाठी पाणी खेचणार्‍या आणखी दोनशे जोडण्यांचे पाईप कापून टाकले. सुरुवातीला विरोध करणार्‍या शेतकर्‍यांशी पथकाने चर्चा केल्यानंतर काही शेतकर्‍यांनी स्वत:हून विद्युत मोटारी काढण्यास सुरुवात केली आहे.

विष्णुपुरी जलाशयातील पिण्यासाठी राखीव असलेले पाणी वाचवण्यासाठी प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. पाण्याच्या संरक्षणासाठी नायब तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली दोन स्वतंत्र पथक नेमलेले असून जिल्हाधिकारी धीरजकुमार आणि मनपा आयुक्त जी. श्रीकांत हे या कामावर व्यक्तीगत लक्ष ठेवून आहेत. पथकाने बुधवारपासून (दि.16) धडक कारवाईला सुरुवात केली आहे. प्रारंभी या मोहिमेला विरोध करणार्‍या शेतकर्‍यांना जलाशयातील राखीव जलसाठ्याबद्दलची वस्तुस्थिती लक्षात आणून दिल्यानंतर त्यांचा विरोधही मावळत चालला आहे. काही शेतकर्‍यांनी तर आपल्या मोटारी स्वत:हून काढायला सुरुवात केल्यामुळे पथकाने त्यांचे कौतुक करुन आभार मानले आहेत.

काही गावातील ट्रॉंन्सफार्मरवरुन जलाशयातील पाणी खेचण्यासाठी बेकायदेशीरपणे वीजपुरवठा जोडणी घेतल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. हा प्रकार जिल्हाधिकार्‍यांच्याही कानावर गेला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जलाशयाच्या दक्षिणेकडील भनगी, कपिलेश्वर आणि उत्तरेकडील राहाटी आणि जैतापूर या गावातील ट्रान्सफार्मर काढण्याबाबत महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना कळविले आहे.

नागरिक आणि जनावरे यांच्या पिण्यासाठी पाण्याचा सर्वोच्च प्राधान्यक्रम लक्षात घेऊन सर्व शेतकर्‍यांनी जलाशयात असलेल्या मोटारी व जोडण्या तात्काळ काढून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून जलाशयातून पाणी खेचल्यास आणखी कडक धोरण राबवले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.


====================================================================

====================================================================

====================================================================

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.