nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांवाशमनपा हदिदत पाण्याच्या टँकर व्यवस्थेबाबत. ||  
समाचार

Dated :17-Jan-2013
विष्णुपुरी जलाशयातून शेतीला पाणी घेणारे 434 पाईप कापले  


दक्षता पथकांची कामगिरी : पिण्यासाठी पाणी वाचवण्याची मोहिम सुरु

नांदेड, दि.17: विष्णुपुरी जलाशयातून शेतीसाठी बेकायदेशीररित्या पाणी खेचणार्‍या शेतीपंपाचे 434 पाईप दक्षता पथकाने कापून त्यांचे विद्युत साहित्य जप्त केले आहेत. पाण्याची रखवाली करण्यासाठी नेमलेल्या दोन पथकाकडून जलाशयाच्या दोन्ही बाजूने असलेल्या शेतीपंपावर ही कारवाई करण्यात आली. सदर शेतीपंप पुन्हा विष्णुपुरी जलाशयाला जोडले तर विद्युत मोटारी जप्त करुन त्यांच्याविरुध्द गुन्हे नोंदवण्यात येतील, असा इशारा दक्षता पथकाने दिला आहे.

विष्णुपुरी जलाशयात फक्त पिण्यासाठी पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक आहे. हा जलसाठा संरक्षित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दोन विशेष दक्षता पथकाची स्थापना केली आहे. दोन्ही पथकात नायब तहसीलदार दर्जाच्या प्रत्येकी एका अधिकार्‍यांची पथकप्रमुख म्हणून नेमणूक केली असून महापालिकेचे सहाय्यक आयुक्त दर्जाचे अधिकारी उपपथकप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय महावितरण, जलसंपदा व पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांचा सदर पथकात समावेश आहे.

मंगळवारी (दि.15) पथकाने संपूर्ण जलाशयात फिरुन सर्व शेतकर्‍यांना शेतीला घेण्यात येत असलेला पाणीपुरवठा बंद करण्यासाठी विद्युत मोटारी आणि पाईप जलाशयातून 24 तासात काढून घेण्याची अंतीम पूर्वकल्पना दिली आणि याची अंमलबजावणी झाली नाही तर मोटारी जप्त करुन कारवाई करण्याचा इशारा दिला होता. जिल्हाधिकारी धीरज कुमार आणि मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनीही संयुक्तपणे पाहणी करुन जलाशयातून शेतीसाठी खेचल्या जाणार्‍या पाण्याचा आढावा घेऊन पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार बुधवारी (दि.16) दुपारनंतर नायब तहसीलदार आर. जी. गळगे व सहाय्यक आयुक्त शिवाजी डहाळे यांच्या पथकाने जलशयाच्या उत्तर बाजूने असलेल्या कोटीतीर्थ, थुगाव, बोरगाव (तेलंग), पिंपळगाव (को.), राहाटी या परिसरात जलाशयाकाठावरील कृषीपंप सुरु असलेले 184 पाईप कापून शेतीला सुरु असलेला पाणीपुरवठा खंडीत केला. तर दुसरीकडे गुरुवारी (दि.17) जलाशयाच्या दक्षिण बाजूने नायब तहसीलदार एन. एस. चव्हाण, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त एस. टी. मोरे, जलसंपदा विभागाचे उपअभियंता के. टी. पोफळे, महावितरनचे कनिष्ठ अभियंता जी. एस. तुंगनवार, पोलिस उपनिरिक्षक इंगळे व इतर पोलिस कर्मचार्‍यांच्या पथकाने कल्लाळ, विष्णुपुरी, मार्कंड, पिंपळगाव (नि.), भनगी या गावांच्या परिसरात जलाशयातून शेतीला पाणी देणार्‍या 250 विद्युत पंपाचे पाईप कापून काढले त्याचबरोबर 250 किटकॅट, 80 ‘फूटबॉल’, 60 स्टार्टर असे साहित्य जप्त करुन महावितरण कंपनीच्या स्वाधिन केले. चांगला पाऊस होईपर्यंत शेतकर्‍यांनी पुन्हा जलाशयातून शेतीसाठी पाणी खेचण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या विद्युत मोटारी जप्त करुन त्यांच्याविरुध्द गुन्हे नोंदवण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे.


विष्णुपुरी जलाशयातील सध्यस्थिती
दि. 15 जानेवारी 2013 च्या स्थितीची पाटबंधारे विभागाकडून मिळालेली माहिती अशी: जलाशयात सध्या 37.54 दलघमी साठा शिल्लक असून त्यातील नांदेड शहर, एमआयडीसी व ग्रामीण पाणीपुरवठा योजना यांच्यासाठी एकूण 22.75 दलघमी जलसाठा आरक्षित करण्यात आला आहे. संभाव्य बाष्पीभवन 10 दलघमी आणि टॅंकरने द्यावयासाठी लागणारे 2.50 दलघमी असा एकत्रीत हिशेब लक्षात घेतला तर 35.25 दलघमी पाणी पिण्यासाठीच लागणार आहे. त्यामुळे शेतीकरिता अनाधिकृतपणे वापरण्यात येणार्‍या पाण्यावर तात्काळ निर्बंध घालणे आवश्यक होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने विशेष पथकाची स्थापना केली आहे.

====================================================================

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.