nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांदेड महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत राष्ट्रीय नदीकृती आराखडा (NRAP) अंतर्गत गोदावरी नदी कायमस्वरुपी प्रदुषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे करीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व सल्लागाराची नेमणुक करणे. || साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदल बाबत ||  
समाचार

Dated :15-Jan-2013
थकित मालमत्ता कर भरल्याने लिलाव टळला 


राजपूत महासंघाने भरले आठ लाख रुपये

नांदेड, दि. 15: गाडीपुरा येथील भारतीय राजपूत महासंघाची 9 खुले भूखंड असलेली मालमत्ता महापालिकेच्या वजिराबाद क्षेत्रीय कार्यालयाने जप्त करुन तिचा जाहीर लिलाव ठेवला होता. परंतु मालमत्ताधारकांनी आपल्याकडील थकबाकीची रक्कम भरण्याची तात्काळ तयारी दाखवल्यानंतर मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी मंगळवारी (दि.15) सदर लिलाव स्थगित करुन मालमत्ता करापोटी 8 लाख 12 हजार 380 रुपयांचा धनादेश स्विकारला.

गाडीपुरा येथील हनुमान मंदीराच्या पाठीमागे भारतीय राजपूत महासंघाचे 9 खुले भूखंड आहेत. या भूखंडाच्या मालमत्ता करापोटी गेल्या अनेक वर्षापासून थकबाकी शिल्लक होती. परंतु ही रक्कम भरण्यासाठी कोणीच पुढे येत नसल्याने महापालिकेने मार्च 2012 मध्ये जप्त केली होती. त्यानंतरही कोणीच पुढे आले नव्हते. त्यामुळे थकबाकी व शास्तीच्या 10 लाख 50 हजार 153 रुपयांच्या वसुलीकरिता दि. 26 डिसेंबर 2012 रोजी या सर्व मालमत्तेचा जाहीर लिलाव ठेवला होता. परंतु बोली बोलण्यासाठी कोणीच पुढे आले नसल्याने या मालमत्तांचा पुनर्लिलाव आज मंगळवारी (दि.15) ठेवला होता.

लिलावाआधीच भारतीय राजपूत महासंघाचे अध्यक्ष भानुसिंह रावत, महापालिकेचे विरोधी पक्षनेते दिपकसिंह रावत, सचिव अशोकसिंह तेहरा, माजी नगराध्यक्ष गोविंदसिंह तेहरा, किरणसिंह तेहरा, अनुजासिंह रावत, रविंद्रसिंह तेहरा, गिरीश चौधरी, मोहनसिंह रावत, अशोकसिंह रावत यांच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांची दालनात प्रत्यक्ष भेट घेऊन मूळ मालमत्ता कर, जप्ती खर्च, जाहीर प्रगटन जाहिरात खर्च तात्काळ भरण्याची तयारी दर्शवून लिलाव स्थगित करण्याची विनंती केली. आयुक्तांनी ही विनंती मान्य केल्यानंतर 8 लाख 12 हजार 380 रुपयांचा धनादेश आयुक्तांच्या स्वाधिन करण्यात आला. याप्रसंगी उपायुक्त रत्नाकर वाघमारे, सहाय्यक आयुक्त एस. टी. मोरे, कर निरिक्षक पी. जी. नळगिरे, वसुली लिपीक राजेंद्र बोटलावार, महम्मद वासेफ आदी उपस्थित होते.

वजिराबादेत 51 टक्के करवसुली
वजिराबाद क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 6 कोटी 47 लाख रुपयांची मालमत्ता करापोटी मागणी असून आजपर्यंत यातील 3 कोटी 30 लाख 44 हजार 586 रुपयांची करवसुली झाल्याची माहिती सहाय्यक आयुक्त एस. टी. मोरे यांनी दिली. त्याचबरोबर आतापर्यंत एकूण 19 पैकी 12 मालमत्ता जप्तीतून 17 लाख 34 हजार 360 रुपयांची वसुली केली आहे. उर्वरीत सात मालमत्तांचे मूल्यांकन करुन लवकरच जाहीर लिलाव केला जाणार आहे.

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.