nwcmc
 Systems Pvt. Ltd.-Technical Partner
Weather Icon    
नांदेड महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत राष्ट्रीय नदीकृती आराखडा (NRAP) अंतर्गत गोदावरी नदी कायमस्वरुपी प्रदुषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे करीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व सल्लागाराची नेमणुक करणे. || साफसफाईच्या कामाच्या वेळेत बदल बाबत ||  
समाचार

Dated :10-Jan-2013
पत्रकारांच्या कुटुंबियासाठी दि.13 रोजी आधार नोंदणी 


प्रथम येणार्‍या मर्यादित जणांनाच मिळणार लाभ

नांदेड, दि.10: दर्पण दिनानिमित्त महापालिकेने घेतलेल्या विशेष मोहिमेतून वंचित राहिलेल्या पत्रकार व प्रसारमाध्यम कर्मचार्‍यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी पुन्हा एकदा येत्या रविवारी (दि.13) महापालिका प्रशासकीय इमारतीत आधार नोंदणीची खास सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.

आधार नोंदणी कीटची अपुरी संख्या असल्याने प्रथम येणार्‍या मर्यादित लोकांनाच या सुविधेचा लाभ मिळू शकेल. त्याकरिता पत्रकार किंवा प्रसारमाध्यमात प्रत्यक्ष काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी शुक्रवारी (दि.11) सकाळी 11 ते 12 या वेळेत महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी गोविंद करवा यांना महापालिका प्रशासकीय इमारतीत दालन क्र. 117, जनसंपर्क विभाग, पहिला मजला येथे प्रत्यक्ष भेटून त्यांच्याकडून टोकन आणि आधार नोंदणी फॉर्मस उपलब्ध करुन घ्यावे. ज्यांना हे फॉर्मस वितरित केले, त्याच व्यक्तींची रविवारी (दि.13) दिलेल्या वेळेत नोंदणी केली जाणार आहे. त्यामुळे इतरांनी या दिवशी येऊन आपली गैरसोय करुन घेऊ नये तसेच प्रसारमाध्यम कर्मचार्‍यांच्या कुटुंबाशिवाय मित्र, नातेवाईक अथवा अन्य कोणीही टोकण घेण्यासाठी येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या रविवारी (दि.6) दर्पण दिनानिमित्त झालेल्या या विशेष मोहिमेत प्रसारमाध्यम कर्मचार्‍यांच्या कुटुंबातील 134 सदस्यांची नोंदणी झाली होती तर हाताच्या बोटांची ठसे यंत्रावर उमटत नसल्याने जवळपास 25 जणांना परत जावे लागले होते. आधार नोंदणीसाठी रहिवाश्यांचे बोटांचे ठसे, डोळ्यांच्या बुबुळाची स्कॅनिंग, छायाचित्र घेणे, तसेच माहिती अचूकपणे संगणकात समाविष्ट करणे याकरिता लागणार्‍या सरासरी वेळेमुळे मर्यादित लोकांचीच नोंदणी शक्य होती. त्यामुळे नोंदणीसाठी आलेल्या अनेक सदस्यांना परत जावे लागले होते.

काही पत्रकारांनी आयुक्त जी. श्रीकांत आणि नोडल ऑफीसर तथा अप्पर आयुक्त रा. ल. गगराणी यांना भेटून पत्रकारांसाठी आणखी एका रविवारी आधार नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली असून प्रसारमाध्यम प्रतिनिधी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नोडल ऑफीसर तथा अप्पर आयुक्त रा. ल. गगराणी यांनी केले आहे.

नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे
आधार नोंदणीसाठी येताना फोटो ओळख असल्याचे मान्य करता येण्यायोग्य ओळखपत्र तसेच रहिवासी पुरावा असलेले कोणतेही प्रमाणित कागदपत्र यांची मूळ व झेरॉक्स प्रत सोबत आणणे आवश्यक असून विशेष सुविधेअंतर्गत टोकण नोंदणी करण्यासाठी प्रसारमाध्यम कर्मचार्‍यांनी आपले ओळखपत्र किंवा संपादकाचे शिफारसपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे.

====================================================================

Elbiz Systems Pvt.Ltd Indore NWCMC IT DEPT.