9 कर्मचा-यांची आस्थापना विभागात पदस्थापना
नांदेड, दि. 9: महापालिकेतील एलबीटी विभागात गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या 9 कर्मचार्यांच्या मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी आज बुधवारी (दि.9) तडकाफडकी बदल्या करुन या सर्वांना आस्थापना विभागात पाठवले आहे. त्यांच्या जागेवर नव्या सहा कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
एलबीटी कराद्वारे महापालिकेला अपेक्षित महसूल मिळत नसल्याने सर्वसाधारण सभेत अनेक वेळा चर्चा झाली. त्यानंतर गेल्या दोन महिन्यात आयुक्त जी. श्रीकांत यांनी या विभागावर लक्ष केंद्रीत करुन उत्पन्न वाढीसाठी एलबीटी चुकवणारे व्यापारी शोधून त्यांच्यावर धडक कारवाईची मोहिम हाती घेतली होती. त्यामुळे उत्पन्नात वाढ होऊ लागली. स्थानिक संस्था कराच्या रुपाने महसूल मिळण्यासाठी बराच वाव असताना विभागातील काही कर्मचार्यांचे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी काही नगरसेवकांनी आयुक्तांकडे सर्वसाधारण सभेत तसेच प्रत्यक्ष भेटून केल्या होत्या.
दुसरीकडे एलबीटी विभागाच्या साप्ताहिक बैठकीत आयुक्तांनी कर्मचार्यांना उत्पन्न वाढीसाठी काही सूचना केल्या होत्या. परंतु त्याची अंमलबजावणी करण्याकडे कर्मचार्यांनी दुर्लक्ष केल्याचे समोर आल्यानंतर मंगळवारी (दि.8) आयुक्तांनी स्वत: एलबीती विभागास भेट दिली तेव्हा तेथे कर्मचा-यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. या कर्यपद्धतीबाबत आयुक्तांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. गेल्या अनेक वर्षापासून काही कर्मचारी याच विभागात एकाच ठिकाणी कार्यकरत असल्याने त्यांना हलवण्याचा प्रस्तावही आयुक्तांच्या विचाराधिन होता.सर्व बाबींचा अभ्यास आणि कर्मचार्यांच्या कामाचे अवलोकन करुन आयुक्तांनी आज बदल्यांचे आदेश जारी केले. संबधित कर्मचार्यांनी 24 तासाच्या आत आपल्या पदस्थापनेच्या नव्या ठिकाणी हजर व्हावे, असे या आदेशात म्हटले आहे.
वरिष्ठ लिपीक तानाजी कानोटे, वहिदू जमा, लोहिया, जाकेर, मंजुळदास सोळंके, विलास गजभारे, राजेश जाधव, गिरीश काटीकर आणि शिपाई जाकेर या नऊ जणांची बदली स्थानिक संस्था कर विभागातून आस्थापना विभागात करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागेवर वजिराबाद क्षेत्रीय कार्यालयातून वरिष्ठ लिपीक टी. एस. खरपास, आयुक्त कक्षातून इमारत निरिक्षक विजय कुलकर्णी, कर विभागातून लिपिक राजेश क-हाळे, आयुक्त कक्षातील संगणकचालक रमेश हैबते, जाहिरात विभागातील लिपीक नागेश एकाळे, मालमत्ता विभागातील लिपीक हिराचंद सायन्ना यांना एलबीटी विभागात पाठवण्यात आले आहे.