आठवड्याभरात विवरणपत्र दाखल करा, अन्यथा दुकानांना सील
नांदेड, दि. 11: महापालिका हद्दीत व्यवसाय करणा-या सुमारे आठशे व्यापार्यांना महापालिकेच्या एलबीटी विभागाने नमुना ‘ज’ ची नोटीस दिली असून व्यवहाराच्या हिशेबाची कागदपत्रे मागितली आहेत. येत्या आठवड्याभरात त्यांनी अभिलेख्यांची पूर्तता केली नाही तर त्यांची दुकाने सील करुन पुढील कारवाई केली जाईल, असा इशारा एलबीटी विभागाच्या सहायक आयुक्त सौ. वसुधा फड यांनी दिला आहे.
स्थानिक संस्था करांअतर्गत 2010-11 चे वार्षीक विवरणपत्र दाखल केलेल्या व्यापार्यांच्या निर्धारणाचे काम सध्या सुरु आहे. अशी विवरणपत्रे दाखल केलेल्या व्यापार्यांना महापालिकेने नमुना ‘ज’ ची नोटीस देऊन त्यांच्याकडून बॅलेन्स सीट, ऑडीट रिपोर्ट, खरेदी विक्रीचे बुक, बिले अशा कागदपत्रांची मागणी केली आहे. संबंधीत व्यापार्यांना याबाबत वेळोवेळी दूरध्वनीवर सूचनादेखील देण्यात आली आहे. निर्धारणाच्या कामासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे जमा करण्यासाठी एक आठवड्य़ाची शेवटची संधी देण्यात येत असून ज्यांनी पूर्तता केली नाही, त्यांची दुकाने सील करुन स्थानिक संस्था कर अधिनियम 2010 प्रमाणे पुढील कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.